मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मी देशभक्त, अंधभक्त नाही असे म्हणत उद्धव यांनी मुंबईत शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राम मंदिरावरुन भाजपावर हल्लाबोल केला. राम मंदिराच्या निमित्ताने दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण दिवाळं निघालंय त्यावर चर्चा करा असेही उद्धव म्हणाले. उद्धव यांच्या वक्तव्याला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करून उत्तर दिले. आशिष शेलार यांनी तीन मुद्दे मांडत उद्धव यांच्यावर निशाणा साधला.
‘श्रीमान उद्धव ठाकरे, आज काय बिलकीस बानो प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेताय ? की पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा, दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (JuD) आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक भुट्टावी याचा मृत्यू झाला त्याबद्दल श्रध्दांजली अर्पण करताय ? किंवा विकासाचा महासेतू खुला झाला त्यावर मळमळ, जळजळ व्यक्त करताय ? बोला, आम्ही पण आज बोलणार आहोतच!’ या शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला.