शिर्डी, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : श्रीराम हा बहुजन होता, क्षत्रिय होता, १४ वर्षे वनवासात असताना तो शिकार करुन खायचा, असे वक्तव्य करुन सुप्रिया गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वाद ओढवून घेतला होता. या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला होता. त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांना खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. रोहित पवार काय बोलतात त्याकडे मी फार लक्ष देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणं खूप सोपं आहे. ते अजून लहान आहेत, त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. ते गुरुवारी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.