नागपूर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला…. लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लोकांना सतत झुंजवत ठेवण्याचे काम केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
भाजपाचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपले सरकार असताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलेही, पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊन देणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, हे भाजपाचं वचन आहे. भाजपामधील ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणे साहजिक आहे. पण दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष आपल्या समाजाला न्याय देईल, यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत समाजात विभाजनाचे लोण पसरू देऊ नका, असे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणतात, गरीबी ही एकच जात आहे. आरक्षणाची भावना गरीबीतून निर्माण होते. त्या भावनेपोटी आपण मागास आहोत, असे संबंधितांना वाटते. त्यामुळे आपण आरक्षण देऊच. परंतु, मागासलेपणच दूर नाही झाले तर कितीही आरक्षण देऊन फायदा होणार नाही; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण शेवटी एक बोट त्यांच्याकडेच गेले, तुमचे बापजादे इतकी वर्षे होते, त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? हा प्रश्न लोकांनीच उपस्थित केला. याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा भाजापवर विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.