नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ओबेरॉय समुहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराजसिंह ओबेरॉय यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात आणि व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पृथ्वीराजसिंह ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये ईआयएच लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्षपद आणि ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले होते. भारतासह जगातील अनेक शहरांमध्ये ओबेरॉय समुहाची पंचतारांकीत हॉटेल पृथ्वीराजसिंह ओबेरॉय यांच्या कार्यकाळात सुरू झाली. ओबेरॉय यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय लक्झरी ट्रॅव्हल मार्केटने २०१२ मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. ओबेरॉय समूह हा पंचतारांकीत हॉटेलांसाठी आजही जगभर प्रसिद्ध आहे.