अंतरवाली सराटी, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेवेळी लाखोंची गर्दी जमली होती. यावेळी अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या ४४१ बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतीची जमीन सभास्थान म्हणून वापरल्याने झालेल्या नुकसानासाठी ४४१ शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचे शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. याआधी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आणि सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. सरकारने टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा केल्याने मराठा समाजाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आधीच २५ लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.