अहमदनगर, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. ढाकणेंवर गोरी पिंपळगाव येथे शनिवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही भाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा स्रोत खात्याचे राज्यमंत्री होते. ते विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात सक्रिय होते. गेल्यावर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.
बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा राजकीय कारकिर्दीच्या पायऱ्या ते चढत गेले. आक्रमक राजकीय नेता अशी त्यांची ओळख होती. हाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री ही पदे पण त्यांनी भूषवली होती. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून बबनराव ढाकणे परिचित होते. तीन वेळा विधानसभा सदस्य, एकवेळ विधान परिषद सदस्य, एक वेळ खासदार आणि त्याचवेळी केंद्र सरकारचे राज्यमंत्री या जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या होत्या.