मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. याआधी दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होऊन टिकणारे मराठा आरक्षण देणार असल्याची शपथ घेतली. तसेच मराठ्यांना आत्महत्या करू नका, असे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले तरी मुदत संपल्याचे कारण देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सुरू होताच हालचालींना वेग आला. मुंबईतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत.