जळगाव, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी खोचक शब्दात शरद पवारांवर टीका केली. पक्षांतर कोणापासून आणि कोणाच्या काळात सुरू झालं हे सर्वज्ञात आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
शरद पवार काँग्रेस पक्ष सोडून बाहेर पडले. पवारांसोबत काँग्रेसचे ४० आमदार पण बाहेर पडले होते. पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि इतर पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रातले पहिले आघाडी सरकार स्थापन केले होते. हा होता पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा पहिला प्रयोग होता. या प्रयोगामुळे शरद पवार ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. ते महाराष्ट्रातले सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. पुलोद सरकारची स्थापना १८ जुलै १९७८ रोजी झाली. इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात १७ फेब्रुवारी १९८० रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली. यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. पवारांची समाजवादी काँग्रेस विरोधी पक्षाचे काम करू लागली. पवारांनी १९८७ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याच घटनेचा संदर्भ लक्षात ठेवून पक्षांतर कोणापासून आणि कोणाच्या काळात सुरू झालं हे सर्वज्ञात आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.