मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्या मुंबई आणि वाराणसी येथील घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. अबू आझमी यांच्यावर १६० कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप आहे. याआधी आर्थिक अफरातफरी प्रकरणी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली.
वाराणसीच्या विनायक ग्रुपच्या करचोरीची चौकशी सुरू आहे. या चौकशीचा भाग म्हणून अबू असीम आझमी यांच्या घरांवर धाड पडली आहे.
विनायक ग्रुप
विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, व्यावसायिक शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि निवासी उंच इमारती बांधल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी तपासात असे आढळून आले की कागदावर विनायक ग्रुपमध्ये तीन भागीदार होते- सर्वेश अग्रवाल, समीर दोशी आणि आभा गुप्ता. आभा गुप्ता या दिवंगत गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत, त्या अबू असीम आझमी यांच्या जवळच्या मित्र आणि सहकारी असल्याचं म्हटलं जात होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान तिन्ही भागीदारांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स, ईमेल आणि स्टेटमेंट्स अॅक्सेस करण्यात आल्या आणि विनायक ग्रुपमधून मिळणारे उत्पन्न चार भागात वाटून घेतल्याचे उघड झाले आणि चौथा भाग अबू असीम आझमी यांना हवालाद्वारे देण्यात आल्याचे उघड झाले.
कोण होते गणेश गुप्ता ?
गणेश गुप्ता महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते आणि कुलाबा येथील आझमी यांच्या इमारतीतून त्यांचे कार्यालय चालवत होते. गणेश गुप्ता यांच्या निधनानंतर आभा गुप्ता या विनायक ग्रुपच्या भागीदार झाल्या.