खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानं मंगळवारी (१९ सप्टेंबर) आपल्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये कॅनडानं आपल्या देशातील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये न जाण्यास सांगितलं आहे. कॅनडानं यामागे देशातील नागरिकांच्या सुरक्षेचं कारण दिलं आहे. अपडेटेड अॅडव्हायजरीमध्ये कॅनडानं म्हटलंय की, “जम्मू काश्मिरमध्ये जाऊ नका, कारण तिथे दहशतवाद, अतिरेकी, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे.”
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचं कॅनडाच्या संसदेला संबोधिक करताना म्हटलं होतं. तेव्हापासून संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य फेटाळून लावलं आहे. त्यावरुन कॅनडा आणि भारत यांच्यात मोठा वाद उफाळून आला आहे. कॅनडाने केवळ आरोपच केले नाहीत, तर भारतीय राजदूतांची देशातून हकालपट्टीही केली होती. अशातच आता कॅनडानं नवी अॅडव्हायजरी जारी करत वादात आणखी भर टाकली आहे.
कॅनडाच्या या वक्तव्यानंतर भारतानेही पलटवार करत अत्यंत परखड शब्दांत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खडे बोल सुनावले आहेत. कॅनडाकडून करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, भारतानेही कॅनडाच्या एका वरिष्ठ राजदुताची हकालपट्टी केली आहे.