नाशिक, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकमध्ये हिंदी कवी संमेलनात मराठी भाषिकांचा अपमान झाला. कवी कालिदास नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारात ही घटना घडली. मनसेने या घटनेचा निषेध केला आणि आयोजकांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.
कवी कुमार विश्वास नाशिकच्या कवी संमेलनाला प्रमुख कवी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला आणि त्यांचा जाहीर अपमान केला. कार्यक्रम फक्त हिंदी भाषिकांसाठीच आहे असे सांगत आयोजकांनी अपमान केला.
हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभा नाशिक यांनी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे बॅनर नाशिकमध्ये ठिकठिकाणी लावले होते. निवडक वृत्तपत्रांमध्ये कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पण कार्यक्रमाचे पास कुठे मिळणार याबाबत माहिती दिली नव्हती. यामुळे कार्यक्रम विनामूल्य आहे असे समजून काही मराठी नागरिक कार्यक्रमस्थळी गेले होते. या मराठी नागरिकांना कार्यक्रमस्थळी अडवण्यात आले. एका आयोजकाने कार्यक्रम फक्त हिंदी भाषिकांसाठीच आहे, तुम्ही इथे कसे आलात ? असा प्रश्न उपस्थित करत मराठी भाषिकांचा अपमान केला.
मनसेने माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार, हिंदी कवी संमेलनासाठी निमंत्रितांना पास वाटप करण्यात आले होते. पण याबाबतची माहिती जाहीर केली नव्हती. यामुळे कार्यक्रम विनामूल्य आहे असे समजून आलेल्या मराठी भाषिकांचा अपमान करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन आक्रमक पवित्रा घेतला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच आयोजकांनी कवी संमेलनाचा कार्यक्रम रद्द केला.