जालना, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी राज्य शासनाकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाला एक महिन्याचा अवधी देत असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मराठा आरक्षण समर्थकांनी संयम बाळगावा आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
जरांगेंनी केल्या पाच मागण्या
१. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाच्या नागरिकांना सरसकट कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे
२. महाराष्ट्रात मराठा आरक्षण समर्थकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे
३. मराठा आंदोलकांवर कठोर कारवाई करणाऱ्यांचे निलंबन करावे
४. जरांगे उपोषण सोडतील त्यावेळी उपोषणस्थळी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित असावे
५. सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेत उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे दोघे मध्यस्ती म्हणून असावेत
आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठोस पावलं टाकत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणी संबधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे; असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.