शिर्डी, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी बारा खासदारांनी आधीच उद्धव गटाला धक्का दिला आहे. आता उद्धव गटाला आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव गटाचे उपनेते आणि शिर्डी मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे उद्धव गटाला धक्का बसला. यानंतर २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी देऊ असे आश्वासन देऊन उद्धव ठाकरे यांनी बबनराव घोलप यांना उपनेते आणि शिर्डी मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी दिली. घोलप त्यांचे काम करत असताना अचानक माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना उद्धव गटात प्रवेश देण्यात आला. या निर्णयामुळे अस्वस्थ झालेल्या घोलप यांनी काही काळ वाट बघितली. पण न्याय मिळत नाही हे जाणवताच घोलप यांनी राजीनामा दिला.
कोण आहेत बबनराव घोलप
बबनराव घोलप हे १९९५ मध्ये शिवसेना – भाजपा सरकारमध्ये मंत्री होते. नाशिकचा देवळाली मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघातून ते पंचवीस वर्षे आमदार राहिले आहेत. तर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे देखील पाच वर्ष शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत. बबनराव घोलप यांच्या निर्णयाने आता उद्धव गटात खळबळ उडाली आहे.