जालना, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही उमटले आहेत. पोलिसांनी केलेल्या या बेछूट हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला आहे. अनेक शहरे आणि जिल्ह्यात सकाळपासूनच कडकडीट बंद सुरू आहे. व्यापाऱ्यांनी तर दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला आहे. तर अनेक जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी निदर्शनही करण्यात येणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बंदला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
राज्यात आज औरंगाबाद, सातारा आणि बारामतीत मराठी संघटनांनी बंद पुकारला आहे. बारामतीत मोर्चाही काढला जाणार आहे. तर सकल मराठा संघटनेने पुण्यातील खेड, चाकण आणि आळंदीत बंद पुकारला आहे. या बंदला वकील असोसिएशनने पाठिंबा दिला असून व्यापारी संघटनाही बंदमध्ये उतरल्या आहेत. खेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत. तसेच चाकण आणि राजगुरूनगर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद सुरू आहे.
सोलापूरच्या बार्शीतही बंदची हाक देण्यात आली आहे. बार्शीत मराठा संघटनांकडून आज सकाळी निदर्शने करण्यात येणार आहेत. बार्शीत सर्व दुकाने बंद आहेत. हॉस्पिटल, मेडिकल आणि शाळा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील संकेश्वर उद्यान, कसबा पेठ आणि कोर्ट परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत.
नाशिकच्या लासलगावसह ४२ गावातील दुकाने बंद राहणार आहेत. याशिवाय लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हिंगोली आणि नांदेडमध्येही सकाळापासूनच बंद सुरू आहे. नांदेड शहरातील राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान बंदचे पडसाद सकाळ पासून जाणवायला सुरुवात झालीय, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. मराठा समाजाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलकावर लाठीचार्ज, गोळीबार करणाऱ्यावर आणि त्यांना आदेश देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज कल्याणमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील दुकानदार, रिक्षाचालक, व्यावसायिकानी या बंदला पाठिंबा दिल्याने शहरात शुकशुकाट पसरला आहे.