मुंबई, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: गणेशोत्सवाला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून अनेक मोठ्या मंडळांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी गणेशमूर्ती आपल्या मंडळात नेल्या. परळच्या वर्कशॉपमधून निघणाऱ्या मोठ्या बाप्पांच्या अनेक मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. ढोल-ताशा, फटाके, गुलालच्या रंगीबेरंगी रंगांच्या उधळणीत गणपती बाप्पांचे स्वागत केले गेले.
कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी आपला मोठा फौजफाटा तैनात केला होता. गर्दी कमी करून मिरवणुकीला आणि वाहुकीला जागा मिळावी, यासाठी पोलीस मोठ्या संख्येने होते. मात्र गर्दी जास्त असल्याने सार्वजनिक बस, चारचाक्या, दुचाक्या, १५ ते २० मिनिटे जागच्या हलतच नव्हत्या. लागोपाठ वर्कशॉपमधून गणपती निघाल्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी वाढतच होती.
युवक – युवती, लहान मुले, जेष्ठ मंडळी सर्वच एकत्र रस्त्यावर एकवटल्याने रस्त्यावरची गर्दी वाढतच होती. गणेशाचे मनमोहक रूप, आपल्या कॅमेरात, मोबाईलमध्ये साठवून ठेवावे, यासाठी कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.