मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. रुपेश मोरे याला ही धमकी देण्यात आली असून, त्याचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहे. त्याआधारे धमकावत ३० लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे. या धमकीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्फिया शेख या महिलेच्या नावे रुपेश मोरे यांना व्हॉट्सॲपवर मेसेज आले आहेत. रुपेश याचा अल्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाला आहे, असे ग्रामसेवक, ग्रामपंचायत वडगाव, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद येथील बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहे. ते मोरे यांना व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आले आहे. तसेच ‘हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना, नहीं तो आपके उपर रेप के केस कर देंगे, अशी धमकी दिली आहे.
काही दिवसांनी त्याच नंबरवरुन पुन्हा एक मेसेज आला. त्यामध्ये ‘मै अल्फिया शेख, ३० लाख रुपये नही दिये तो रेप केस मे अंदर कर दुंगी, असा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्यानंतर ‘दे रहा है क्या पैसा, नहीं तो मार दूंगा. तेरी पुरी सेटिंग हुई है, बहुत जल्द तेरे को गोली मार के जायेंगे, तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’ असा आणखी एक धमकीचा मेसेज आला. या धमकीमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.