उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात आजपासून सत्तासंघर्षाच्या सुनावणी सुरु असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदेंकडून मला मारण्याची सुपारी दिली असल्याचे पत्रात राऊतांनी म्हंटले आहे. राऊतांनी हे पत्र ट्विट केले आहे.
संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’,अशा आशयाचे पत्र संजय राऊत यांनी दिले आहे.