मुंबईत दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जास्त पाऊस पडल्याने मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे.सायन,किंगसर्कल, हिंदमाता बोरिवली, कांदिवली इथेही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची नोंद आहे. पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग बंद करावा लागला आहे. हवामान खात्यानेही पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफच्या पाच तुकड्या दाखल केल्या आहेत.सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तर यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे.
वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर लोकल ट्रेनचाही खोळंबा झाला आहे. आज सकाळपासून सेंट्रल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पावसाचा सध्याचा जोर पाहता आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.या पाऊसाचा फटका हार्बर लाईन वर देखील झाला आहे. लोकलवर ही झाला आहे. धीम्या गतीने लोकल चालू असल्याने प्रवाशांना ऑफिस ला पोहचण्यासाठी उशीर होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने होत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर तिन्ही मार्गावर लोकल सेवेला फटका बसला आहे.