राज्य शासनाचा तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी ऐरोली विधानसभा क्षेत्रासाठी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार गणेश नाईक प्रयत्नशील होते. यातून ऐरोली विधानसभा मतदार संघात आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण, स्कायवॉक, मार्केट अशा सुविधा उभ्या राहणार आहेत. या निधीच्या माध्यमातून शहरी भाग, गावठाण, झोपडपट्टी, औद्योगिक भाग, आदिवासी परिसर अशा सर्वच विभागांमध्ये सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण करणार असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येतो.
आमदार गणेश नाईक यांच्या मागणीनुसार १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून शहराच्या आणि नागरिकांच्या गरज ओळखून नागरी सुविधांचे निर्माण केले जाणार आहे. एरोली सेक्टर ०१ येथे जुन्या मासळी मार्केटच्या जागी ५० लाख खर्चातून नवीन मासळी मार्केट उभे केले जाणार आहे. सेक्टर ०३ येथे १ करोड खर्चातून जय भवानी नवीन मंडई उभारणार आहे. घणसोली सेक्टर ०७ येथे भुकंड क्र. ०६ वर तब्ब्ल ०२ कोटी रुपये खर्चून सुसज्ज आरोग्य केंद्र उभारणार आहे. अडवली भूतवाली येथील शाळा क्र. १४ मध्ये वाढीव मजल्यांचे बांधकाम करण्यासाठी विशेष निधीमधून ०१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. अशी विविध सर्वांगीण कामे शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून पूर्ण केली जाणार आहे.