देशातील तरुण मतदार आणि विद्यार्थ्यांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी काँग्रेसचे खासदार तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नवा उपक्रम सुरू केला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी 'Ask Me Anything' (AMA) सत्राची घोषणा करत जनरेशन झेड (Gen Z) आणि विद्यार्थ्यांना कोणताही प्रश्न विचारण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. अलीकडच्या काळात राजकीय नेते सोशल मीडियाचा अधिक प्रभावीपणे वापर करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्टाग्रामवर रील्स शेअर केल्यानंतर आता राहुल गांधी यांनीही संवादाचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे.
इन्स्टाग्रामवरून थेट प्रश्न विचारण्याचे आवाहन
राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत म्हटले की, "विद्यार्थी आणि Gen Z, तुमचे प्रश्न आणि मतं जाणून घेण्यासाठी मी तयार आहे. इन्स्टाग्रामवर मला काहीही विचारा. शक्य तितक्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन." यासोबतच त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रश्न पाठवण्यासाठी विशेष लिंकही उपलब्ध करून दिली आहे. या लिंकद्वारे विद्यार्थी आणि तरुणांना थेट प्रश्न पाठवता येणार आहेत.
'X' वरूनही दिला संदेश
इन्स्टाग्रामनंतर राहुल गांधी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही याच मोहिमेची माहिती दिली. विद्यार्थी आणि Gen Z यांना कोणताही प्रश्न विचारण्याचे आवाहन करत त्यांनी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
अलाहाबाद विद्यापीठातील आंदोलनालाही दिला पाठिंबा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भूमिका मांडली होती. शुल्कवाढ आणि प्रवेश जागांमध्ये झालेल्या कपातीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या मते, विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारवर गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवरही टीका करत तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते, आंदोलने मोडून काढली जातात आणि विरोध करणाऱ्यांवर दबाव टाकला जातो, असा दावा त्यांनी केला. तसेच प्रयागराज येथे विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जाण्याच्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमातही प्रशासनाने अडथळे आणल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न देशासमोर मांडत राहणार असून, त्यांच्या हक्कासाठी आपण कायम आवाज उठवत राहू, अशी भूमिकाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.