मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. तर मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येतही काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचे संकेत नागरिकांना दिले आहेत. मात्र त्याचवेळेस त्यांनी राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आता पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेचन नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १८ वर्षांखालील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याच्या केंद्राच्या सूचना असून कोरोना लसीकरणासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, काल राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ११,०९२ इतकी होती. तर ही कोरोना रुग्णांची संख्या २० हजारच्या घरात पोहचू शकते. मुंबईत सध्या १३०० सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण दुपट्टीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या २२०० रुग्ण सापडत असल्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट ४ टक्के आहे, हे चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले, दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे नियम पाळावेच लागतील. तसेच निंर्बंधाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स मिळून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमात नियमांचे पालन होत नसल्यामुळे अशा ठिकाणी पोलीस विभागाला सांगून बंधने आणावे लागतील असेही आरोग्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात १३ कोटी ९० लाख कोरोना लसीकरण झाले आहे. तर राज्यातील ८७ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ५७ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.