मुंबई, १३ जुलै २०२३ , प्रतिनिधी : भारताच्या तिसऱ्या चांद्रयानाचे उद्या (१४ जुलै रोजी ) अंतराळात प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी देशाची दुसरी चांद्रमोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाली होती. त्यामुळे इस्रो आता पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.
चांद्रयान-३ मोहिमेसाठी १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटामध्ये असणाऱ्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या २३ किंवा २४ तारखेपर्यंत चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचेल, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
दरम्यान या प्रक्षेपणासाठी जुलै महिनाच का निवडला असे प्रश्न उपस्थित होत आहेत .
चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी जुलै महिन्याची निवड करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. जुलै महिन्यात चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे चंद्रमोहीमेची बहुतांश प्रक्षेपणे जुलै महिन्यात केली जातात. तर येत्या १४ जुलैला प्रेक्षेपण करण्यामागे देखील विशेष कराहून आहे.
कोणत्याही अवकाशयानाला चंद्रावर उतरायचे असेल, तर तिथे प्रकाश असणं गरजेचं आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्यामुळे तिथे सूर्योदय कधी होतो यानुसार प्रक्षेपणाची तारीख ठरवणं गरजेचे असते.
चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी असल्यामुळे, चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीवरील १४ ते १५ दिवसांचा असतो. त्यामुळे हे १५ दिवस चंद्रावर प्रकाश असतो, तर बाकी १५ दिवस अंधार. चंद्रयानाच्या लँडिंगसाठी चंद्रावरील पूर्ण एक दिवसाचा कालावधी गरजेचा आहे. यामुळे यासाठी १४ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
या मोहिमेतून भारत चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण भागात एकाही देशाने लँडिंग केलेलं नाही. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे.