महाराष्ट्र राज्याला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. मंगळवारी, ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तब्बल ६२ वर्षानंतर महाराष्ट्र राज्याला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत असेल, असा निर्णय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून अधिकृतरित्या स्वीकार करण्यात येणार आहे.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिले आहे. श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केले असून शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे.
सध्या भारतातील एकूण ११ राज्यांना आणि एका केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे अधिकृत राज्यगीत आहे. या राज्यांमध्ये आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू, उत्तरखंड आणि आता महाराष्ट्राचाही समावेश आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.