एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कृती समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये बैठकीमध्ये झालेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
विलीनीकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा कामावर येण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची शक्यता नाही हे राज्य सरकारने सांगितले आहे, पण त्यात सुधारणा आहे का? हा प्रश्न न्यायालयात उपस्थित आहे. तसेच कृती समितीने त्यांच्या मागण्या सांगितल्या आहेत. एसटी पुन्हा सुरू होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ, सातवा वेतन आयोग आणि कर्मचाऱ्यांवरील कारवाई या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. दरम्यान आत्तापर्यत तीन वेळा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, त्यामुळे अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.