राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डोंबिवलीमधील ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला तर दुसरीकडे मुंबईकरांना पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील धारावीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
धारावीमध्ये टांझानिया येथून आलेला प्रवाशाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान धारावीत सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णाला तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमयाक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.
कोरोना काळात धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्त झाली असून आता ओमायक्रॉन विषाणूमुळे धारावीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच धारावीतील सर्व शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.