राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अशातच आता, मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वडाळा आगारातील भाडेतत्वावरील बस गाड्यांच्या चालकांनी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या मुंबईकराची मोठी तारांबळ उडाली.
भाडेतत्वावर बसगाड्या चालवणाऱ्या चालकांनी संप पुकारला आहे. पाच ते सहा महिने वेतन न मिळाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मासिक वेतनासह कामावर रुजू होण्याबाबतचे पत्र न मिळाल्यामुळे बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत.
नुकतंच, राज्यात एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनाचे राज्यभरातून पडसाद उमटले. तर दुसरीकडे आज वडाळा आणि वांद्रे इथे बेस्ट कामगारांनी वेतन थकल्यामुळे आंदोलन केले आहे. कर्मचाऱ्यांनी बस न चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. वडाळा आणि वांद्रे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आगारामध्येच आंदोलन छेडले असून मागण्या पुर्ण होईपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर काढणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.