एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या कृती समितीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. तसेच न्याय मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र कोणालाही वेठीस धरू नका, त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.
अनिल परब म्हणाले, एसटी महामंडळ विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन पुकारले आहे. याप्रकरणी एक समिती कार्यकरत आहे. दरम्यान आम्ही कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली. तसेच वेतनवाढीबाबतचा निर्णय काही कर्मचाऱ्यांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांना योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आज कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ, सातवा वेतन आयोग आणि कर्मचाऱ्यांवरील कारवाई या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच आत्तापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, त्यामुळे अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना संप सुरूच आहेत. मात्र राज्यात ठिकठिकाणी एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन शरद पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचेही शरद पवार म्हणाले.