कांदिवलीच्या जलतरण तलावाच्या लोकार्पणावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य जुंपत रंगली. या जलतरण तलावाचे लोकार्पण भाजप आमदार योगेश सागर यांच्या हस्ते रविवारी होणार होते. मात्र, त्यापूर्वीच महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांदिवलीत येऊन जलतरण तलावाचे लोकार्पण केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
भाजप नेते योगेश सागर यांच्या हस्ते होणाऱ्या जलतरण तलावाचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लोकार्पण कार्यक्रमात प्रचंड गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. हा लोकार्पण सोहळा सुरू असतानाच योगेश सागरही घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केल्या. मात्र, शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले असताना महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार योगेश सागर व्यासपीठावर हास्य विनोद करताना दिसत होते.
कांदिवली पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या सुशोभिकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे कोरोना काळानंतर या तलावाचे काम पूर्ण झाले. तर भाजप आमदार योगेश सागर यांच्या हस्ते उद्या या जलतरण तलावाचे लोकार्पण होणार होते. मात्र, आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज या तलावाचे लोकार्पण केले आहे.