पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने आम्ही केलेल्या कामांचेच उद्धाटन होत असल्याची टीका होत आहे. नेहेमीप्रमाणे गुरुवारी सकाळी देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हाही मोदी दौऱ्याबाबत चर्चा झाली.
यावेळी संजय राऊत यांनी ‘भारत जोडो’बाबत सांगितले. कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. त्यामुळे शिवसेनेची पाऊले त्यात उमटली पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही त्यात सहभागी होऊ. यासाठी दोन दिवस जम्मू काश्मिरला जाणार आहे. त्याठिकाणी हजारो काश्मिरी पंडित सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मी त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, काश्मिरी पंडितांसोबत चर्चा करणार आहे. विस्थापितांच्या शिष्टमंडळाला भेटणार आहे. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रेद्वारे ऐतिहासिक कार्यक्रम घेतला. साडेचार हजार किलोमीटरपेक्षा जास्त चालत प्रवास करणे हे सोप्पे नाही. त्यामुळे संपूर्ण देश मनाने आणि भावनेने जोडला पाहिजे. देशातील द्वेष आणि सूडाची भावना संपायला हवी. हा राहुल गांधींचा उद्देश आहे. आणि राजकीय मतभेद बाजूला सारुन आम्ही यात सहभागी होऊन पाठिंबा देणार.