मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. नारायण राणे म्हणाले, ‘१५ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद पार पडली. मात्र, पत्रकार परिषदेमध्ये राऊतांना घाम फुटला, तर राऊतांना एवढ दिवस शिवसेना भवन आठवले नाही. तसेच संजय राऊत शिवसेना वाढवण्यासाठी नाही आहेत तर यांचे लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत, त्या खुर्चीवर आहे. संजय राऊतांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहे’, असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावला आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘संजय राऊत यांनी पत्रकार परिषद कशाला घेतली होती? तसेच शिवसेनेने पत्रकार परिषद घेतलेली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. या पत्रकार परिषदेला विभागप्रमुखही आले नाहीत, तर नेते मंत्री, पक्षप्रमुखही आले नाहीत. फक्त नाशिकचे मोजके लोक आले होते’, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ‘१० मे १९९२ रोजी संजय राऊत सामनामध्ये संपादक म्हणून आले. त्याआधी ते लोकप्रामध्ये होते. लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकेर यांच्याविरोधात अनेक लेख लिहिले आहेत. तर बाळासाहेबांनीदेखील त्यांच्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे एका संपादकाने जे शब्द वापरले आहेत ते आम्ही वापरू शकत नाही’, असे नारायण राणे म्हणाले.