शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेदरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असा केला. हा जो कुणी मुलुंडचा दलाल आहे. ज्याला मराठीमध्ये भडवा म्हणतात, त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबांनी कोर्लाई गावात १९ बंगले बांधून ठेवले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे माझे त्या दलालाला आव्हान आहे की, आपण त्या बंगल्यात फिरण्यास जाऊ, जर ठाकरेंचे १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेल, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्यांनी मुंबईत मराठी भाषा सक्तीची नको, यासाठी न्यायलयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मराठी भाषेचा अपमान करणारे किरीट सोमय्या भाजपचे फ्रंटमॅन आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. हेच लोक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करत आहेत. आणि हा दलाल मराठी भाषेच्या विरूद्ध न्यायालयात गेला. त्यामुळे किरीट सोमय्यांचे तोंड बंद करा नाहीतर आम्ही करू, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजपच्या काही नेत्यांनी सांगितले की, तपास यंत्रणा मागे लागतील तर माझ्या कुटुंबांना नाहक त्रास दिला जात असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्र, मराठी माणसाविरोधात आक्रमणाला शिवसेना उत्तर देणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.