शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन समाजविघातक घटक म्हणून टॅप करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे. एकनाथ खडसे यांचा फोन ६७ तर संजय राऊतांचा फोन ६० वेळा टॅप करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचा फोन ६० वेळा तर एकनाथ खडसे यांचा फोन ६७ वेळा टॅप करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर निशाणा साधला.