मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टहासापोटी राणा दाम्पत्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याची जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असं जाहीर केलं होत. याप्रकरणी, राणा दाम्पत्य अटकेत असन त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. मात्र, सत्र न्यायालयानेदेखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला कोठडीतच रहावे लागणार असून याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
राणा दाम्पत्याने शनिवारी (२३ एप्रिल ) मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती. यासाठी न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयानेही राणा दाम्पत्यांचा अर्ज फेटाळला असून पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.