हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनतेचा विजय; राज ठाकरे यांची परखड प्रतिक्रिया

हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्य सरकारची माघार; राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे मराठी जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली, आणि समितीला इशाराही दिला.<br/><br/>

हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनतेचा विजय; राज ठाकरे यांची परखड प्रतिक्रिया

मुंबई: हिंदी सक्तीच्या आदेशावरून राज्यात निर्माण झालेल्या वादाला मोठं वळण मिळालं असून, सरकारने अखेर माघार घेत दोन्ही संबंधित शासन निर्णय रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप करत, मराठी जनतेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वात आधी या निर्णयाला विरोध करत राज्यभर आवाज उठवला आणि त्यानंतर अनेक राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिक या लढ्यात सहभागी झाले. सरकारच्या या यू-टर्ननंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक परखड पोस्ट शेअर करत मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

हेही वाचा: 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द; हिंदी सक्तीच्या आदेशावर सरकारचा यूटर्न

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील 2 जीआर रद्द केले.  याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.

पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.

अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.

आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.

असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.

मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.

– राज ठाकरे

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number