केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामुळे जनतेला कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे गरिबांचा किती गळा आवळतात आणि देशातील श्रीमंत आणखी किती श्रीमंत होतात हे येत्या काळात पाहू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घटकांचा सर्वव्यापी विचार करत काहीतरी देण्याच प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व देण्यात आले आहे.