विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर केला. त्यामुळे मुंबईत पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुडांना मोठ्या पदावर बसवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच नोटाबंदीच्या काळात फडणवीसांनी बनावट नोटांचा खेळ सुरू केल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात बनावट नोटांचा खेळ सुरू असून १४ कोटी बनावट नोटा सापडल्यानंतर हे प्रकरण फडणवीसांनी दाबले असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसेच बनावट नोटींचे हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात का आले नाही? असा सवालही मलिकांनी उपस्थित केला आहे.
मलिकांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केला आहे. खोट्या नोटांच्या खटल्याला समीर वानखेडेंनी कमकुवत केल्याचा आरोप मलिकांनी वानखेडेंवर केला आहे. मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी नाव जोडून माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम केले आहे. यासाठी त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा ही लढाई मी सुरूच ठेवणार आहे, असेही मलिक यांनी ठणकावले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की ते दिवाळीनंतर फटाके फोडणार मात्र त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजच येऊ शकला नाही. फडणवीसांनी एक माहोल तयार केला की नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत. त्यासाठी काही कागदपत्रे समोर आणली. पण त्यांना ज्यांनी कुणी माहिती दिली आहे ते कच्चे खिलाडी आहेत, असे नवाब यांनी सांगितले.