मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावरील पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने 15/16, 16/17, 17/18 आणि 18/19 जुलै 2026 या चार रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दररोज रात्री 1.15 ते पहाटे 4.15 या वेळेत राहणार असून, या काळात काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते वडाळा रोड या विभागात ब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवरील स्लीपर बदलण्याचे काम या कालावधीत केले जाणार आहे.या ब्लॉकमुळे 15 ते 18 जुलैदरम्यान रात्री 10.54 वाजता सुटणारी CSMT–गोरेगाव लोकल रद्द राहील. तसेच 16 ते 19 जुलैदरम्यान पहाटे 4.28 वाजता सुटणारी CSMT–गोरेगाव लोकल आणि रात्री 12.02 वाजता सुटणारी गोरेगाव–CSMT लोकलही रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय, रात्री 10.24 वाजता सुटणारी वांद्रे–CSMT लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंतच धावणार असून ती तेथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. तसेच सकाळी 5.33 वाजता सुटणारी गोरेगाव–CSMT लोकल वडाळा रोड स्थानकावरून सकाळी 6.10 वाजता पुढे सुटणार असून ती शॉर्ट ओरिजिनेट म्हणून चालवली जाणार आहे.
ब्लॉकपूर्वी CSMTहून गोरेगावकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 10.24 वाजता, तर गोरेगावहून CSMTकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 11.33 वाजता असेल. ब्लॉकनंतर CSMTहून गोरेगावकडे पहिली लोकल पहाटे 4.56 वाजता, तर गोरेगावहून CSMTकडे पहिली लोकल पहाटे 5.05 वाजता धावेल. मात्र, CSMT–पनवेल–CSMT हार्बर मार्गावरील लोकल सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.