मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संभाजीराजेंचे आमरण उपोषण सुरू आहे.
मराठा समाजाला वेठीस धरू नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. मी एकटाच या उपोषणाला बसणार होतो, मात्र अनेकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मला पाठिंबा म्हणजे मराठा समाजाला पाठिंबा असल्याचे संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घून गेले नाहीत तर सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. तसेच माझा लढा गरीब मराठा समाजासाठी असल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी २०१३मध्ये लाखोंच्या संख्येने आंदोलन केले होते. ज्यावेळी तेढ निर्माण होण्याची शक्यता होती त्यावेळी आम्ही लढा दिला. मात्र, राणे समितीने दिलेले आरक्षण टिकले नाही. तसेच कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली नाही तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतले नसल्याचे संभाजीराजे म्हणाले. तर मराठी आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संभाजीरराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या एल्गाराला पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा आंदोलक नाशिकहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून हजारे मराठा समर्थक मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले आहेत.