रत्नागिरीतील बारसू सोलगाव पंचक्रोशीत होऊ घातलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सोमवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. मात्र, बारसू प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असणार असल्यामुळे संघर्षाची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ एकटवले आहे. त्यामुळे समोवारी ग्रामस्थ अडथळा आणू शकतात. या पार्श्वभूमीवर, सर्वेक्षणात हस्तक्षेप झाल्यास तो मोडून काढण्यासाठी सरकारने २००० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रिफायनरी विरुद्ध तसेच रिफायनरी सर्वेक्षण संदर्भात कुठल्याही संरक्षणास मनाई करण्याचे ठराव केले आहेत. त्यामुळे किहीती फौजफाटा तैनात केला तरी हे सर्वेक्षण रोखूच, असे बारसू प्रकल्प विरोधकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पास स्थानिकांचा विरोध नसल्याचे अमरावतीत स्पष्ट केले आहे.
मविआ सरकार असताना बारसू प्रकल्पाबाबत केंद्राला पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, राज्यात मविआ सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा बारसू प्रकल्पाला गती मिळाली आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. अशातच, बारसू प्रकल्पाला प्राधान्य देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.