Andheri Railway Station: मुंबईच्या लोकल रेल्वे स्थानकांवर मराठी भाषेचा आदर आणि स्थानिक प्रवाशांना मिळणारी वागणूक यावरून पुन्हा एकदा नवा वाद पेटला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकावर एका मराठी प्रवाशाला केवळ आपल्या मातृभाषेत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे तब्बल 1 तास एका खोलीत डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात रेल्वे सेवा देताना तिकीट परीक्षकांनी (TC) मराठीत बोलावे, अशी साधी अपेक्षा या प्रवाशाने व्यक्त केली होती. मात्र, हा आग्रह तिथल्या अमराठी तिकीट परीक्षकांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी अधिकाराचा गैरवापर करत प्रवाशाला बंदी बनवल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
अमराठी टीसींना वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाची धडपड
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने स्वतःची चूक सुधारण्याऐवजी उलट पीडित प्रवाशाचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशावर थेट सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक संघटनांच्या दाव्यानुसार, वाद घालणारे आणि प्रवाशाला खोलीत कोंडणारे मूळ टीसी अमराठी होते. मात्र, या प्रकरणाला प्रांतीय किंवा भाषिक रंग मिळू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने त्या अमराठी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत एका मराठी टीसीला पुढे करून कायदेशीर तक्रार नोंदवण्याचा डाव आखल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा – Thane News : ठाण्यात मोठी दुर्घटना! चाळीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, तर अनेकजण जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
मराठी एकीकरण समिती मैदानात; आरपीएफ कार्यालयाबाहेर निदर्शनांचा इशारा
या अन्यायकारक घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक पवित्रा घेत पीडित प्रवाशाला पाठिंबा दिला आहे. मुंबईतच मराठी भाषेचा असा अवमान होणे अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत समितीने रेल्वे प्रशासनाच्या मराठीद्वेषी भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी समितीने अंधेरी पूर्व येथील आरपीएफ (RPF) कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे आता सर्वसामान्य मुंबईकरांमधून 'आपल्याच राज्यात मराठीची मागणी करणे हा गुन्हा आहे का?' असा संतप्त सवाल विचारला जात आहे.