जर एखादी व्यक्ती मृत पावल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्याच दिवशी ती तुम्हाला दिसू लागली तर? तुम्हाला हा भुताटकीचा प्रकार वाटू शकतो. मात्र पंजाबमध्ये खरंच असा प्रकार घडला आहे.ज्या व्यक्तीला मृत्यूनंतर विधीपूर्वक कब्रिस्तानात पुरण्यात आलं, ती व्यक्ती साक्षात कुटुंबियांसमोर दुसऱ्या दिवशी प्रकट झाली. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली. मात्र नेमकं काय घडलं होतं, याचा नंतर खुलासा झाला, तेव्हा हा प्रकार भुताटकीचा नसल्याचं सिद्ध झालं.
मुहम्मद असलम नावाच्या या व्यक्तीबरोबर असा अजब प्रकार घडला. चंडिगढच्या मुहम्मद असलमलादारूचं व्यसन होतं. व्यसनी मुहम्मद बऱ्याचदा घरातून आठवडा आठवडाभर घरातून गायब असे आणि दारूच्या नशेत कुठेतरी पडलेला असे. घरच्यांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही.
असाच अनेक दिवस घराबाहेर गायब असलेल्या मुहम्मद असलमच्या मृत्यूची खबर कुटुंबियांना मिळाली. बस स्थानकावर आढळलेला मृतदेह विधीपूर्वक दफन करण्यात आला. कुटुंबात दुःखाचं वातावरण होतं. मात्र त्याचे अंत्यसंस्कार करून 1 दिवसही उलटत नाही, तोच मुहम्मद असलम दारात हजर झाला आणि घरातील नातलगांची भीतीने गाळण उडाली. मात्र मुहम्मद असलमचं हे भूत नसून तोच खरोखर जिवंत परत आल्याची लोकांची खात्री पटली. त्यानंतर यासंदर्भात टचौकशी केल्यावर असा खुलासा झाला की ज्या व्यक्तीला मुहम्मद असलम समजून पुरलं, तो प्रत्यक्षा मुहम्मद खालिद नावाचा भलताच इसम होता.
मुहम्मद असलम परतल्यामुळे घरातल्यांना आनंद होत असला, तरी या गोंधळामुळे परिसरात मोठी खळबळ माजली.