Mumbai Local Train Updates: मुंबईकरांनो, विरारला जात असाल तर थांबा! रुळांवर पाणी साचल्याने वसईच्या पुढे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प

संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे विरार रेल्वे स्थानक आणि रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

Mumbai Local Train Updates: मुंबईकरांनो, विरारला जात असाल तर थांबा! रुळांवर पाणी साचल्याने वसईच्या पुढे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प

Mumbai Local Train Updates: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली असून याचा थेट फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वसई-विरार पट्ट्यात आधीच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी पावसाने काही काळ विश्रांती घेतली, मात्र संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे विरार रेल्वे स्थानक आणि रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने वसई रोडच्या पुढे जाणारी लोकल वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद केली आहे.

लोकल 10 मिनिटे उशिराने; नालासोपारा, विरारचा संपर्क तुटला
सध्या पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या केवळ चर्चगेट ते वसई रोड दरम्यानच चालवल्या जात आहेत. रेल्वे रुळांवर पाणी असल्याने सुरू असलेल्या गाड्याही आपल्या नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. वसईच्या पुढे गाड्या जात नसल्याने नालासोपारा आणि विरार स्थानकांकडे जाणारा रेल्वेमार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.

घरी कसं परतायचं? चाकरमान्यांसमोर ऐन गर्दीच्या वेळी मोठे संकट
सकाळी पाऊस ओसरल्याचे पाहून विरार आणि नालासोपारा परिसरातील हजारो नोकरदार नेहमीप्रमाणे मुंबईतील आपापल्या कार्यालयांमध्ये कामासाठी आले होते. मात्र, आता संध्याकाळी घरी परतण्याच्या ऐन गर्दीच्या वेळीच विरारची लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयातून सुटल्यानंतर आता विरारला घरी कसे पोहोचायचे, असा गंभीर प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा – Tree Fall Incidents In Mumbai: मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान; 24 तासांत 400 हून अधिक झाडं कोसळली, अनेक ठिकाणी खचल्या भिंती

वसई स्थानकावर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता
रेल्वे सेवा खंडित झाल्यामुळे वसई रोड स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महामार्गावर आणि शहरातील रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहतुकीचे इतर पर्याय निवडणे प्रवाशांसाठी कठीण झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास प्रवाशांचा खोळंबा रात्री उशिरापर्यंत होण्याची चिन्हे आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत सूचना आणि रेल्वेचे अपडेट्स पाहूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number