मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असल्याने खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. खाटा उपलब्ध व्हाव्या यासाठी महापालिकेनं उपाययोजना हाती घेतल्या असून हॉटेल्समध्येही विलगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यातच दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयातील खाटांच्या मागणीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेनं दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: कोरोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे जसलोक रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना दाखल केले जाणार नव्हते. शनिवारी सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेनं आपला निर्णय मागे घेतला आहे.
महापालिकेच्या निर्णयानंतर जसलोक रुग्णालयाने कोविड रुग्णांसाठीच्या बेडमध्ये वाढ करण्याचं आश्वासन महापालिकेला दिलं. रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांसाठी सध्या ५८ खाटा असून, १५० पर्यंत वाढवण्याची तयारी जसलोक रुग्णालयाच्या प्रशासनाने दर्शविल्यानंतर महापालिकेनं जसलोक पूर्णतः कोविड रुग्णालय करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.