AI Ticket Scam: मुंबईच्या एसी लोकल ट्रेनमध्ये एआयचा (Artificial Intelligence) वापर करून बनावट तिकिटे तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेने ताबडतोब कारवाई करत तिन्ही प्रवाशांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणात तिकीट तपासनीस प्रशांत कांबळेंनी दाखवलेली सतर्कता महत्त्वाची ठरली.
घटना कशी उघडकीस आली?
दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी परळ-कल्याण एसी लोकलमध्ये संध्याकाळी 6:45 वाजता टीटीई प्रशांत कांबळे आणि रेल्वे संरक्षण दल तिकिट तपासणी करत होते. या दरम्यान एक तरुणी आणि दोन तरुण यांनी त्यांच्या मोबाइलमधील डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह केलेली तिकिटांची प्रत दाखवली. UTS अॅपमध्ये ती तिकिटे उघडत नसल्याने टीटीईला शंका आली. जेव्हा अॅपमधून तिकीट दाखवण्यास सांगितले, तेव्हा तिघेही ते दाखवू शकले नाहीत.
हेही वाचा – Elections 2025 : मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ! तब्बल 7 हजार मतदारांचे वॉर्ड बदलले
एकाच तिकीट क्रमांकामुळे उघड झाला स्कॅम
तिन्ही तिकिटांचे क्रमांक XOOJHN4569 एकसारखे आढळले, तर खरी UTS तिकिटे नेहमी भिन्न क्रमांकांमध्ये तयार होतात. मोबाईल नंबर तपासल्यावरही रेल्वे रेकॉर्डमध्ये त्यांच्याशी संबंधित सीझन पास अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तपासात निष्पन्न झाले की ही तिकिटे AI टूल वापरून तयार केली होती.
रेल्वेचा इशारा
मध्य रेल्वेने TTE प्रशांत कांबळे यांच्या सतर्कतेचे कौतुक केले आहे. रेल्वेने प्रवाशांना अधिकृत स्रोतांसह UTS अॅप, ATVM मशीन, अधिकृत बुकिंग काउंटर यांमधूनच तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. AI-जनरेटेड किंवा बनावट तिकिटे वापरणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही रेल्वेने स्पष्ट केले. अशा प्रकरणांवर आता अधिक कडक नजर ठेवली जाणार आहे.