आज अधिवेशनादरम्यान सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या मताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. आपण या ठिकाणी जनेतेचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. त्यामुळे आपण आपला दर्जा कायम ठेवला पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तिला कायदे मंडळाचे महत्त्व समजले पाहिजे. अशातच आमदारांना सकारात्मक काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत फडणवीसांनी आचारसंहितेचे समर्थन केले आहे.
मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी १२ आमदारांच्या निलंबनावरही भाष्य केले आहे. बेकायदेशीर निलंबनामुळे न्यायालयीन हस्तक्षेपाला संधी असल्याचे म्हणत फडणवीसांनी सभागृहात काळजी व्यक्त केली आहे.
विधानभवानाच्या सभागृहात कुणी चुकले तर चार तास बाहेर ठेवा परंतु कुणालाही बारा महिने सभागृहाबाहेर ठेवू नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले. यावेळी उपमुख्यमंत्री यांना किमान जाणीव आहे की, बारा महिन्यांसाठी सदस्यत्व रद्द करणे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
आज हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. आणि आजही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मात्र सभागृहातील अनेक आमदारांकडून सभागृहाच्या आचारसंहितेचा भंग करण्यात आला. त्यामुळे आज विधानसभेत विचार मंथन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी समर्थन केले.