केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांनी ट्विट केले की, ‘पिता-पुत्र तुरूंगात जाणार आहेत. थांबा आणि पाहा. तुरुगांचे सॅनिटायझेशन सुरू करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र.’
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र! — Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
संजय राऊत म्हणाले, ‘ईडीकडे काम नाही. जे महाराष्ट्रात आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या मागे पडत आहेत. पडायचेच असेल तर पडा, परंतु तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. तुम्ही शिवसेनेशी पंगा घेतला तर ते त्यांना खूप जड जाईल, एवढेच मी सांगतो.’
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या हे बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना ईडीची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि त्यापैकी काही हिस्सा ईडीच्या अधिकाऱ्यांना नेऊन देतात, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
ते म्हणाले, किरीट सोमय्या आणि त्यांचा मित्र अमित देसाई यांनी बिल्डरला धमकी देत त्याचा प्लॉट लाटला. ८ जीव्हीपीडी स्कीम रोड, सुजीत नवाज प्लॉट या जागेची बाजारभावानुसार किंमत ११० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ईडीची धमकी देऊन किरीट सोमय्या यांनी हा प्लॉट संबंधित बिल्डरला मातीमोल भावात अमित देसाई यांच्या नावावर करायला लावला.
किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी निगडित कागदपत्र सादर करून खुलासा केला आहे. तसेच रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील १९ बंगल्यांचा कर भरला असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे १९ बंगले कुठे आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.