गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कोरोनाचा उद्रेक झालेल्या मुंबईत कोरोना परिस्थिती गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत नागरिकांना आवाहन केले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करत म्हटले की, मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता बऱ्यापैकी कमी होत आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने कोरोना लस घेण्याचे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. कोरोना लस घेतलेल्यांना कोरोना झाला तरी तो सौम्य प्रकारचा असतो. फेब्रुवारी २०२१पासून आजपर्यंत कोरोनामुळे जितके मृत्यू झाले आहेत, त्यापैकी ९४ टक्के नागरिकांनी कोरोना लस घेतली नव्हती. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्येक नागरिकाला कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत २ हजारांची घट झालेली आहे. मुंबईत मंगळवारी ११ हजार ६४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला आहे.