आज 6 जून रोजी दुपारी आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. यावेळी 2024 मध्ये टीम इंडियाला आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला मोठा धक्का देण्यात आला आहे. इंग्लंड आणि आयरलँड विरोधातील टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा असून, सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.
तसेच उपकर्णधार पदासाठी ऑलराउंडर अक्षर पटेल याच्या जागी तिलक वर्मा याची वर्णी लागली आहे. तसेच बीसीसीआयने 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी संधी दिली आहे. टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 17 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान एशियन गेम्स होणार आहेत. यापूर्वीच बीसीसीआयने सूर्यकुमार यादव संदर्भात मोठे निर्णय घेतले आहेत. एकीकडे त्याचं कर्णधारपद गेलं असताना त्याला आता बीसीसीआयने दुहेरी झटका दिला आहे.
सूर्यकुमार यादव कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नसल्यामुळे तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टी 20 फॉर्मेटमध्ये खेळतोय. मात्र बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या दोन्ही टी 20i मालिकांमधून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवचं आंतरराष्ट्रीय करियर धोक्यात असल्याचं मानलं जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नऊ मालिका आणि स्पर्धा जिंकल्या. मात्र नुकत्याच त्याच्या आयपीएलमधील आणि कर्णधार असताना देखील टी 20 मध्ये दाखवलेल्या खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले की, "हा निर्णय सोपा नव्हता, विशेषतः आम्ही नुकताच विश्वचषक जिंकल्यानंतर, प्रत्येक विश्वचषकासाठी तुम्ही भविष्यातील रणनीती आणि सर्वोत्तम निर्णय कोणता असेल याचा विचार करता. पुढील विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, आम्हाला वाटले की हाच योग्य निर्णय असेल. मी आधीही म्हटल्याप्रमाणे, श्रेयस अय्यर कर्णधारपदासाठी पूर्णपणे पात्र आणि योग्य निवड आहे."
गेली दोन वर्षे सूर्यकुमार यादवसाठी वैयक्तिक फॉर्मच्या बाबतीत विशेष चांगली राहिलेली नाहीत. 2026 च्या टी20 विश्वचषकात त्याने 9 सामन्यांमध्ये 242 धावा केल्या. संपूर्ण विश्वचषकात त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले. त्याआधी, न्यूझीलंडविरुद्धची मालिका चांगली झाली होती, पण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये तो अपयशीही ठरला.