आपल्या फेसबुकवर सतत हिंदू धर्मविरोधी तसंच ब्राह्मण समाजावर टीका करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या मुंबईतील एका होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आलंय. सुनील कुमार निषाद असं या 38 वर्षीय डॉक्टरचे नाव असून सतत हिंदू धर्माला टार्गेट करणाऱ्या पोस्ट्समधून धार्मिक भावना भडकावण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 15 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या बाहेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
शनिवारी मुंबईतील विक्रोळीमधील पार्कसाईट पोलीस ठाण्यात डॉ. निषाद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारदार रवींद्र तिवारी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
ते स्वतःही विक्रोळी भागातच राहतात.
त्यांच्या तक्रारीनंतर धार्मिक भावना भडकवण्याप्रकरणी IPC कलम 295 (A) अंतर्गत डॉ. निषाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
विक्रोळीतील पार्कसाईट पोलीस निषाद यांचा शोध घेत होते.
15 मे रोजी डॉ. निषाद हे मुंबई सत्र न्यायालयात अंतरिम जामिन मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी आले होते.
मात्र, त्याआधी सत्र न्यायालयाबाहेरच पोलिसांनी त्यांना अटक केली.
सातत्याने हिंदूविरोधात आपल्या फेसबुक पोस्ट्सद्वारे जनभावना भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वीही त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.