राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशीनंतर अटक केली आहे. आज पहाटे ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहचले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. ईडीकडून मलिकांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले.
ईडीने नवाब मलिकांना अटकेची कारवाई केल्यानंतर मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठ जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातून आल्यानंतर मलिक पीएमएलए न्यायालयात हजर झाले. मलिकांसोबत मलिकांची बहिणही न्यायालयात हजर झाली. यावेळी नवाब मलिकांनी न्यायालयात सांगितले की, सकाळी ईडीचे अधिकारी माझ्या घरी आले, मला ईडी कार्यालयात घेऊन गेले. मला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर माझे म्हणणे नोंदावले. त्यांनी मला ईडी कार्यालयात समन्सची प्रत दिली आणि त्यावर सही करण्यास सांगितले. तसेच ईडीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.
नवाब मलिक न्यायलयात हजर झाल्यानंतर न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांना गर्दी कमी करण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांच्या आदेशानंतर पोलिसांकडून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पीएमएलए न्यायालयात ईडीकडून अतिरिक्त महाअधिवक्ता अनिल सिंह यांनी युक्तीवाद लढावला तर ऍड. अमित देसाई यांनी नवाब मलिकांसाठी युक्तीवाद केला.